पंढरीची वारी आणि शेतकरी वारीची माहिती 2022 संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्न करूयात. अखंड महाराष्ट्राला एकत्रित करून ठेवणारा आणी एका भक्ती संप्रदायात गुंफून ठेवणारा जर कोणता मजबूत धागा असेल तर तो आहे वारीचा.
भक्तीच्या मजबूत पायाने बांधलेली ही इमारत त्या “विठ्ठल रुपी” कळसाला आपल्या परम भक्ती भावाने स्पर्श करण्याचे सामर्थ्य या वारीच्या माध्यमातून प्रदान करते. कारण या वारीचा अर्थच आहे, “वा”गण्याची “रीत” ती “वारी”
जणू हे परस्पर समीकरण आहे. ज्याला वागण्याची रीत कळली त्याला वारी कळाली, अन् ज्याला वारी कळली त्याला वागण्याची रीत कळाली.
“संत आणि भक्ती” भक्त परंपरेचे ‘अधिष्ठान’ असलेली वारी हा वारकऱ्यांचा जीव की प्राण आहे.
प्रपंच साधून परमार्थ कसा साधायचा, याचा संदेश वारी देते. एकंदरीत वारीचा संदर्भ हा संत ज्ञानेश्र्वर पूर्व काळात मिळतो. म्हणजे ही प्रथा त्याआधीपासुंच सुरू झाली आहे असे मानल्या जाते.
पंढरीची वारी आणि शेतकरी अर्थात पंढरीची वारी माहिती 2022
वारीमध्ये आता अलीकडच्या काळात उच्चभ्रू लोकं यायला लागलीत नाहीतर पूर्वा पार काळापासूनच “शेतकरी” आणि “शेतमजूर” हाच वारीचा प्राण राहिला आहे.
शेतीची पेरणीची कामे आटोपली की जवळपास आषाढ महिन्यात वारीची सुरुवात होते. म्हणजे आपल्या ठिकाणापासून पंढरपूरला पायी चालत जाण्याच्या प्रवासाला “वारी” म्हणतात.
पण महाराष्ट्राच्या विविध भागातून पालख्या पंढरपुरात विठ्ठलाच्या भेटीसाठी येतात. त्यातील सर्वात महत्वाच्या दोन पालख्या म्हणजे एक संत ज्ञानेश्र्वर आणि दुसरी संत तुकाराम.
देहू आणि आळंदी या ठिकाणांहन काही हजारावर निघणाऱ्या या वारीत हळूहळू लाखो जन समुदाय मिळून जातो. “माझी” ही भावना नाहीशी होऊन”आपलं” ही भावना वारीत दृढ होते.
आपला सर्वांचा कर्ता करविता तो विटेवर अठ्ठावीस युगांपासून उभा असलेला विठुराया आहे. माझ्या वाट्याला येणारे कर्म त्यानेच दिलेले आहे, म्हणून ते काम कीतीही खडतर असो, शेतकरी- वारकरी अत्यंत आनंदाने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
पंढरीची वारी आणि शेतकरी Pandharpur Wari 2022
अगदी छोट्या सुखानेही गगनाला भिडणारा त्याचा आनंद श्रीमंतलाही लाजवेल असा असतो. त्याचं कारण एकच असतं मित्रांनो ते म्हणजे समाधान.
वारीचं तेच तर महत्व आहे, इथ वारकरी सुखापेक्षा समाधान शोधतो. हेच पहा ना, ज्या पावसामध्ये भिजून आपण आजारी पडू असे वाटून जो श्रीमंत घराच्या आत बसतो, त्यात त्याला सुख वाटतं असते.
आणि ज्या वारीत शेतकरी तन, मन, धनाने सामील झालेला असतो, त्या वारीत पायी चालतांना चालणाऱ्या मुसळधार पावसाचा आनंद घेऊन वारकरी समाधान शोधत असतो.
आपल्या वर्षभराच्या थकव्याने आणि विठ्ठल भेटीच्या ओढीने व्याकूळ झालेला शेतकरी अक्षरशः आपले दुःख विसरून जातो. कारण त्यांना पुरेशी जाणीव असते, की ह्या सर्वांचा कर्ता करविता तो सर्व व्यापी, सच्चिदानंद सदगुरू माऊली आहे.
अगदी निस्वार्थी, निष्कपट आणि प्रेम भावनेने सामील झालेले वारकरी एका अनोख्या जीवनाचा परमानंद जणु या वारीत घेतात.
पुढील लेख पण वाचा शेतकऱ्यांनो आता गरिबीतच नाही मारायचं
पंढरीची वारी आणि शेतकरी जिव्हाळ्याचा विषय
वारी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी हा विठ्ठलाचा अतिशय निस्सीम भक्त आहे. परमेश्वर सदैव माझ्या पाठीशी आहे, त्याच्या कृपेनेच माझ्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे, याची त्याला जाणीव आहे.
माझ्या प्रत्येक कामात त्याचा सहभाग आहे, ही भावनाच मूळात शेतकऱ्याला कष्ट करण्याची प्रेरणा देते.
तस म्हटलच आहे,
“हा नाम्याची खीर चाखतो,
चोखोबाची गुरे राखतो.”
अगदी निष्काम कर्म करीत असताना त्या विठुरायाचे नाम ओठी आले तर खडतर कष्टही शेतकऱ्यांसाठी ‘अमृताचा ठेवा’ बनून जातो.
विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेला शेतकरी केव्हा एकदा या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि केव्हा पांडुरंगाला डोळे भरून पाहतो, असं वाटायला लागत. आता सध्या तर महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून विविध ठिकाणाहून पायी दिंडी निघतात. जीवनातील सर्व दुःखांचा जर कूठे विसर पडत असेल तर तो म्हणजे वारीत.
पंढरीची वारी आणि शेतकरी एक दृढ नातं
एकदा वारीमध्ये सामील झालेला शेतकरी पुन्हा वारी चुकवत नाही. भौतिक सुखापेक्षा “आत्मसुख” किती महत्वाचं असतं आणि तेच आत्मसुख प्राप्त करुन मला परमात्म्याच्या चरणी स्थिरता प्रदान कशी होणार आहे, याचं मर्म जणू या वारीच्या निमित्ताने शेतकऱ्याला समजतं.
तसाही शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याचं कर्म आणि शेतातील कष्ट पाहून देव सुध्दा शेतकऱ्याच्या मदतीला विविध रूपाने धावून आल्याशिवाय राहत नाही.
संत तुकाराम, संत गोरोबा कुंभार, संत सावता माळी इत्यादी सर्वच संतांच्या भक्तीचे स्वरूप एव्हढे खोलवर होते, की स्वतः पांडुरंग त्यांच्या सहवासात रमला.
एकदा वारी सुरु झाली की अक्षरशः घरचा विसर पडतो.
वारीत चालताना एव्हढा पाऊस पडल्यावर देखील त्या पावसाचा वर्षाव जणू विठुरायाचा आशीर्वाद समजून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद वारकरी घेत असतात. विठ्ठलाचा आशीर्वाद जणू भूतलावर पावसाच्या रूपाने बरसत असतो.
वारीचा आनंद घेत शेतकरी मोठ्या उत्साहाने पंढरपुरात पोहोचतो आणी कित्येक युगायुगाची माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्याची आस मनात बाळगून तो गाभाऱ्यात प्रवेश करतो.
विठुरायाच्या पावलांना स्पर्श केल्यावर आणी माऊलीच जिवंत मुर्तिरुप डोळ्यात साठवून जड अंतकरणाने बाहेर येण्यासाठी पावले गाभाऱ्यातच रुतून बसतात.
माऊलींची झालेली ही गळाभेट त्याला प्रेरणा देते कित्येक संकटात त्याला उभे राहण्याची. केवळ माऊलींचे नाव जरी ओठी आले तरी अर्धे दुःख हलक होऊन जातं. वारीहून घरी आल्यावर शेतकरी पुन्हा मोठ्या जोमाने शेतात मशागत सुरु करतो. आणि त्याला खात्रीच नाही तर ठाम विश्वास बसतो की माझ्या श्रमाच्या प्रत्येक कामात विठोबा माझ्या सोबत आहे.
पंढरीची वारी शेतकऱ्यांना प्रेरणा देते.
हा विठोबा माझ्याशी गुजगोष्टी करतो, माझ्या सुखात मला भटकू देत नाही, अन् दुःखाच्या काळात खचू देत नाही. आयुष्याचा मध्य ज्याला साधता आला तो खरा वारकरी.
ज्या जगद्गुरू तुकोबांनी समस्त अज्ञानाच्या दरीत खितपत पडलेल्या समाजाला वर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रत्यक्ष विठ्ठल भक्तीचा सोपा मार्ग सांगितला, त्याच तुकोबारायांची गाथा नदीत डूबवली.
पण माऊली भक्तीचे एव्हढे सामर्थ्य तुकोबारायांच्या साधनेत होते, जो जिवंतपणा भक्तीत होता ती पाहून प्रत्यक्ष भगवंतांनी ती गाथा पाण्याच्या वर आणली. हीच विचारांची सात्विकता आपल्यात यायला हवी. आणि वारीच्या निमित्ताने ती भक्ति साधना परमोच्च बिंदू वर पोहोचवता येते.
त्यासाठी वारीच्या निमित्ताने पंढरीचा हा चोर एकदा का आपल्या हृदयाच्या बंदिखाण्यात बंदिस्त केला की, ह्या परमात्म्याला आपल्या आत्म्याशी एकरूप होऊन आयुष्य सफल होण्याचा मार्ग मोकळा झाल्याशिवाय राहत नाही.
ही भावना, ही श्रध्दाच त्याला निस्वार्थी काम करीत राहण्याची प्रेरणा देते आणि त्याच्या मनातून उस्फुर्त उद्गार बाहेर पडतात. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.