मोठे लोक हे केवळ पैशाने मोठे होत नसतात तर विचाराने ते इतरांपेक्षा वेगळे असतात. आयुष्यात अपयश देखील कशा पद्धतीने साजरे करावे याचे उत्तम उदाहरण इलॉन मस्क यांनी दाखवून दिले आहे. १७ जानेवारी रोजी त्यांनी आपल्या एक्स खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला ज्याला कॅप्शन होते सक्सेस इज अनसर्टन बट एंटरटेन्मेंट गॅरंटीड यश अनिश्चित आहे पण मनोरंजन नक्की.
इलॉन मस्क यांनी जो व्हिडीओ शेअर केला होता तो होता त्यांच्या स्टारशिपचे तुकडे झाल्याचा. स्टारशिप हा इलॉन मस्क यांचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट होता.
स्टारशिप हे रॉकेट लाँच केल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १४५ किमी अंतरावर त्यांचे तुकडे झाले यामुळे आसमंत उजळून निघाला. हे तुकडे खाली पडत असतांना या संदर्भातील व्हिडीओ त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला.
यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा
अब्जावधी रुपयांचे नुकसान झाल्यावर निराश होणे साहजिक होते परंतु अपयशही कसे साजरे केले जाते हे त्यांनी दाखवून दिले आहे. यातून त्यांचा दृष्टीकोन लक्षात येतो.
कोणतेही काम करत असतांना अपयश येणे साहजिकच असते परंतु झालेल्या चुका सुधारून परत एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे खरे लढवय्याची खरी ओळख असते.
अपयश स्वीकारायला कोणीच तयार नाही. सध्या तरुणांमध्ये एवढी निराशा आली आहे कि थोडे जरी अपयश आले कि अनेकजण मृत्यूला कवटाळतात.
आपल्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करा
बऱ्याच तरुणांकडे अशा काही कल्पना असतात कि त्यामुळे त्यांचे पर्यायाने समाजाचे देखील भले होऊ शकते परंतु केवळ अपयश येईल या भितीने ते त्यांना जिवंत रूप देवू शकत नाहीत.
आजही भूतकाळात डोकावून बघितले तर एक बाब निसंकोचपणे सांगता येईल कि मोठे जर व्हायचे असेल तर अपयश स्वीकारायला हवे. एकदा का अपयश स्वीकारण्याची सवय झाली कि मग त्याची भीती वाटणे बंद होते आणि जो माणूस निर्भीड बनतो तो यशस्वी होतोच मग क्षेत्र कोणतेही असो.
चालतांना पडणे हे स्वाभाविकच आहे, पाडण्यात अपयश नाही मात्र पडून राहण्यात नक्कीच अपयश आहे.