मंगेश साबळे बिडीओ आणि भ्रष्टाचार.
विहिर मंजुरीसाठी लाच मागितली म्हणून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने फुलंब्री पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर २ लाख रुपयांची उधळण केली. जेंव्हा सर्व पर्याय थांबतात माणूस हतबल होतो तेंव्हा तो न्याय मिळण्यासाठी वाटेल ती कृती करण्यास तयार असतो.
नोटा उधळण्याची कृती नियमानुसार जरी चुकीची असली तरी त्यातून सरकारी व्यवस्थेचा भयंकर चेहरा लक्षात येतो अर्थात सगळेच सरकारी कर्मचारी भ्रष्ट असतातच असे नाही.
भ्रष्टाचार संपविण्याचे सल्ले सगळीकडे पहावयास ऐकावयास मिळतात परंतु आता हा विषय नियंत्रणाबाहेर गेला आहे हि वस्तुस्थिती आपल्याला मान्यच करावी लागेल.
समाजमाध्यमावर गेवराई पायगा येथील सरपंच दिवसभर चर्चेचा विषय बनले होते. शासकीय काम आणि ६ महिने थांब अशी एक म्हण आहे. परंतु आता हाच भ्रष्टाचार आता सर्वांच्या अंगवळणी पडलेला आहे. शासकीय कार्यालय म्हटले कि भ्रष्टाचार हा आलाच हि व्याख्या आता आपण निश्चित केली आहे.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या म्हणी प्रमाणे शेतकरी बांधवांची सध्याची परिस्थिती झालेली आहे. उत्तम शेती म्हणणाऱ्यानी त्यांच्या पोराबाळांना इंग्रजी शाळेत टाकून स्वतः शहरात स्थायिक झाले आहेत. शेतकरी मात्र आहे तिथेच आहे.
शेतकरी बांधवांसाठी विविध योजना शासकीय स्तरावरून राबविल्या जातात परंतु त्या कधी शेतकरी बांधवाना मिळतच नाहीत आणि मिळाल्या तरी त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय अधिकारी साहेबांना लाच द्यावी लागते.
मंगेश साबळे यांचा व्हिडीओ चर्चेचा विषय.
आवाज उठविण्याची उबळ आली तरी प्रत्येक जण मंगेश साबळे नसतो किंबहुना मंगेश साबळे एवढी हिंमत प्रत्येकाकडे असेलच असे नाही.
पंचायत समिती किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर साहेबांची फाईल वजनदार करावी लागते. एवढेच कशाला पिकांचे नुकसान झाल्यावर पिक विमा प्रतिनिधीस काही चिरीमिरी दिली नाही तर आपल्याला पिक विमा मिळणार नाही अशी धास्ती सुद्धा शेतकरी बांधवाच्या मनात असते. तात्पर्य काय तर आज क्वचितच असे एखादे क्षेत्र असेल ज्यामध्ये काम करण्यासाठी लाच मागितली जात नाही.
अर्थात सगळेच अधिकारी भ्रष्टाचारी असतात असेही नाही. अजूनही बरेच शासकीय कर्मचारी असे आहेत कि ज्यांना खरोखर शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचवून त्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्याची इच्छा असते.
सरपंच मंगेश साबळे यांच्या मतानुसार विहीर मंजूर करण्यासाठी रोजगार सेवक ते वरिष्ठ अधिकारी यांचा त्यांना त्रास झाला हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे फरक एवढाच आहे कि कोणी त्याविरुद्ध आवाज उठवत नाही.
भ्रष्टाचार विषयी आवाज उठविणे गरजेचे
आवाज उठविला तरी ज्या पद्धतीने मंगेश साबळे यांनी आवाज उठविला तसे आतापर्यंत कोणी केले नाही. नोटा उधळण्याचा कृतीस समर्थन देता येणार नसले तरी सरपंचाच्या हेतूचे मात्र करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण शेतकरी बांधवाना सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराची झळ सोसावी लागते.
शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहीर नाही. विहीर मिळाली विहिरीत पाणी असेलच याशी शास्वती नाही एवढा खटाटोप करून पिकविलेल्या मालास हवा तसा भाव मिळत नसल्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या आतील आवाज साबळे यांनी उठविला आहे असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही.
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये टेबलाखालून पैसे लोटल्याशिवाय कोणतेच काम होत नाही. याला फक्त अशिक्षित नागरिक किंवा शेतकरीच बळी पडतात असे नाही तर अगदी सुशिक्षित नागरिक देखील याला बळी पडतात. कळते पण वळत नाही.
अनेकदा आपण लाच देणे गुन्हा आहे. भ्रष्टाचार म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे अशा पद्धतीने व्यक्त होत असतो. परंतु जेंव्हा आपली वेळ येते त्यावेळी ‘आपुला आपण करावा विचार । तरावया पार भवसिंधु’ या उक्तीप्रमाणे आपल्याला आपले काम होणे अपेक्षित असे आणि पटकन काम होण्यासाठी आपण काहीपण करायला तयार असतो.
पुढील लेख पण वाचा विहीर अनुदान योजना सुरु मागेल त्याला मिळेल विहीर 4 लाख अनुदान
आपल्या एकट्याने काय होणार आहे, उगाच कोणाच्या रोषाचे का कारण बनावे या भावनेनुसार ज्याला त्याला आपले काम होण्यास मतलब असतो.
शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात हे आता चालणार नाही. प्रत्येकाने कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास लाच देवू नये. असे केल्यासच भ्रष्टाचारास आळा बसू शकतो. वेळ पडली तर अगदी संवेधानिक पद्धतीने भ्रष्टाचार संपविण्यास आपण लढा देणे गरजेचे आहे.