आजच्या या लेखामध्ये आपण बैल पोळा सण, खांदमळणी आणि बैल पाडवा संबधित माहिती जाणून घेणार आहोत. शेतीमध्ये मेहनत करत असतांना बैल हा सगळ्यात जास्त मदत शेतकऱ्यांना करत असतो.
त्यामुळे शेतकरी बंधुंसाठी सगळ्यात महत्वाचा सण म्हणजेच बैल पोळा होय. बैलाविना शेती हि कल्पनाच पूर्वी करता येत नव्हती परंतु जसजसा जमाना आधुनिक होत गेला तसतसा शेतीमध्ये बदल होत गेला.
बैलांमुळे शेणखत मिळते आणि शेण खतामुळे सेंद्रिय शेतीस चालना मिळते. त्यामुळे शेतीतील बैलांचे महत्व खूपच जास्त आहे.
शेती विषयक शासनच्या विविध योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मोफत मिळविण्यासाठी आमच्या Whatsapp Group मध्ये सहभागी व्हा.
बैल पोळा सण आणि त्याचे महत्त्व
खालील लेखामध्ये आपण शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा शेतीमधील सहभाग किती महत्वाचा आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शेतीचे कितीही आधुनिकीकरण झाले तरी ग्रामीण भागामध्ये आजही बैल आणि शेतकरी यांचे अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. यामुळेच ग्रामीण भागामध्ये पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैल पोळा सण हा काही भागामध्ये तीन दिवस साजरा केला जातो.
- खांदमळणी.
- पोळा सण.
- बैल पाडवा.
शेती संबधित शासकीय योजनांचे अर्ज मोबाईलवर कसे भरले जातात हे जाणून घ्या व्हिडीओ पहा.
बैल पोळा सणाच्या एक दिवस आधी साजरा केला जातो खांदमळणी सण
खांदमळणी म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. खांदमळणी हा एक प्रकारे सणाचाच प्रकार आहे जो पोळा सणाच्या एक दिवस अगोदर साजरा केला जातो. खांदमळणी सणाच्या दिवशी खालील क्रिया केली जाते.
- सकाळी बैलांना स्वच्छ पाण्याने धुतले जाते
- बैलांच्या गोठ्यामध्ये खड्डे पडले असतील तर त्यामध्ये मुरूम टाकून बुजविले जाते.
- या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही.
- बैलांना दिवसभर पोटभर चारा दिला जातो.
- पोळा सणासाठी बैलांची शिंगे आकर्षक केली जातात.
- सकाळी आणि संध्याकाळी बैलांच्या शिंगाला तेल लावले जाते.
खांदमळणी सण आणि बैलांचा पूजाविधी
- संध्याकाळी बैलांना गव्हाच्या पिठाची तेलाच्या आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये उकडलेली फळे दिली जातात.
- घरमालकिणीच्या हाताने बैलांच्या शिंगाला सोने लावून पूजा केली जाते.
- पूजेच्या विधीसाठी मोळ गवताची एक वेणी तयार केली जाते. त्या वेणीला पळस या झाडांची पाणे लावलेली असतात.
- पळसाची वेणी बैलांच्या खांद्यावरून तीन किंवा पाच वेळेस फिरविली जाते.
- दुध आणि कढी बैलांच्या खांद्याला मळली जाते.
- बैलांच्या गळ्यात घालण्यात येणाऱ्या घागरमाळा आणि घंट्याच्या नादात ‘उतरा देतो कि पुर्भा देतो’ हे गीत गात बैलांची पूजा केली जाते.
बैल पोळा सण आणि पोळा फोडण्याची पद्धत.
पोळा सणाच्या दिवशी बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग दिला जातो. बैलांच्या अंगावर आकर्षक झुली चढविल्या जातात त्याचप्रमाणे बैलांच्या गळ्यात घागरमाळा आणि इतर साज चढविला जातो.
संध्याकाळी जवळपास ४ ते ५ वाजेच्या दरम्यान गावातील सर्व बैल गावाच्या वेशीपाशी मिरवणुकीसाठी आणले जातात. गावातील एक बैल मनाचा बैल म्हणून निवडला जातो या बैलाच्या अगोदर एकही बैल पुढे जात नाही.
गावात काढली जाते बैलांची मिरवणूक
गावाच्या वेशीमध्ये तोरण बांधले जाते. मानाचा बैल पुढे गेल्यानंतर वेशीतील तोरणाला हात लावून एकेक करत शेतकरी आपापले बैल वेशीतून गावात मिरवणुकीसाठी पुढे नेतात. गावातील मिरवणुकीच्या आधी सर्वात अगोदर शेतकरी स्वतःच्या घरी बैल आणतात.
या ठिकाणी बैलांची पूजा केली जाते. त्यांना पुरण पोळी दिली जाते आणि मग संपूर्ण गावात इतर शेतकऱ्यांच्या घरातील पुरणपोळी खाण्यासाठी बैलांची मिरवणूक काढली जाते.
बैल पाडवा सण
पोळा सण साजरा केल्यानंतर काही गावामध्ये बैल पाडवा सण साजरा करण्याची पद्धत असते. बैल पाडव्यामध्ये बैलांना प्रसिद्ध देवाच्या ठिकाणी नेले जाते. या ठिकाणी बैलांची देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते.
ज्या ठिकाणी बैल पाडवा सण साजरा केला जातो त्या ठिकाणी जंगी कुस्त्यांचे देखील आयोजन केले जाते याला काही ठिकाणी अपवाद देखील असतो. या कुस्ती स्पर्धांमध्ये आजूबाजूंच्या गावातील हौशी तरुण भाग घेत असतात.
बैल, शेती आणि शेतकरी.
पूर्वी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती. शेतीमध्ये काम करत असतांना जर बैल व्यवस्थित चालत नसेल तर शेतकऱ्यांकडून बैलांना चाबकाचा किंवा हातातील काडीचा फटका मारला जात असे परंतु त्याच बैलांना काम झाल्यावर शेतकरी औताचा कासरा सोडतांना मोठ्या मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवत असे. बैल आणि शेतकऱ्यांमध्ये मोठे आपुलकीचे नाते त्यावेळी निर्माण झालेले असल्याचे बघावयास मिळत असे.
बैल शेतीचे फायदे
बैलांच्या सहाय्याने कसत असलेल्या शेतीमध्ये पौष्टिक अन्न निर्माण होत असे याचे कारण म्हणजे पूर्वी शेतकऱ्यांकडे शेतीसाठी बैलांसोबतच दुभत्या जनावरांची संख्या देखील जास्त असायची.
दावणीला असेलेल्या जनावरांचे मोठ्या प्रमाणात शेण जमा करावे लागत असे. हे शेण कुजून उत्कृष्ट शेंद्रीय खत निर्माण होत असल्याने हेच शेणखत सर्वात जास्त शेतीसाठी वापरले जात असे. त्यामुळे बैल आणू दावणीला असलेल्या दुभती जनावरे शेतीसाठी खूपच फायद्याची असायची.
आधुनिकीकरणामुळे बैल शेतीवर आलेली मर्यादा.
ट्रॅक्टरचा अविष्कार झाला आणि खऱ्या अर्थाने शेतीमध्ये आधुनिकीकरण पर्वाची सुरुवात झाली. शेतीच्या मशागतीसाठी सुरुवातीला ट्रॅक्टरचा हवा तसा प्रभाव शेतीमध्ये दिसला नाही.
परंतु हळूहळू मात्र ट्रॅक्टरने शेतमशागतीसाठी ताबा घेतला तो कायमचाच. सध्या शेतीमधील बरीच कामे हि ट्रॅक्टरच्या सहाय्यने केली जातात. शिवाय ज्या कामांना बैलांना करण्यास वेळ लागतो तीच कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने काही मिनिटात करता येत असल्याने आधुनिकीकरणामुळे बैल शेतीवर मर्यादा आलेली आहे.
शेतातील रासायनिक पिक पद्धतीमुळे आरोग्यावर विपरीत होणारा परिणाम
बैलांच्या सहाय्याने पूर्वी करत असलेल्या शेतीतील अन्न चवदार आणि आरोग्यदायी असायचे. पिकांना सेंद्रिय खाते दिली जात असल्याने मानवी आरोग्यास या पिकांमुळे खुच चांगला परिणाम दिसून येत होता.
पूर्वीची माणसे १०० वर्षापेक्षा जास्त जगणे हे त्याचेच एक उत्तम उदाहरण होते. हल्ली शेतीमध्ये जास्त उत्पादन घेण्याच्या नादात शेतीमधील पिकांना प्रचंड प्रमाणात रासायनिक खतांचा आणि औषधांचा भडीमार केला जात आहे. यामुळे मानवी आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणवर विपरीत परिमाण बघावयास मिळत आहेत.
शेतीमध्ये बैलांचा सहभाग आवश्यक.
बैल पोळा सणानिमित्त आपण आधुनिकीकरण, शेती पिके, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, मानवी आरोग्यावर पिकांचा होणारा परिणाम आणि शेतीमधील बैलांचा उपयोग या मुद्द्यावर प्रकर्षाने माहिती जाणून घेतिली.
मित्रांनो केवळ बैल पोळा सण आहे म्हणून बैलांचा शेतीमधील सहभागावर उहापोह करणे ठीक होणार नाही. जर चागंले दीर्घायुषी आणि निरोगी आरोग्य हवे असेल तर शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करणे खूपच गरजेचे आहे.
शेतीमध्ये बैलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला तर आपसूकच शेतीसाठी सेंद्रिय खताची निर्मिती होईल आणि असे सेंद्रिय खाते शेतीसाठी वापरली तर पिके चांगली येईल आणि आपोआपच आरोग्य चांगले राहील.